राष्ट्रवादीला ‘मेगागळती’ लागून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या वळचणीला अनेक आमदार जात असताना दिसत आहेत. नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची व नागपुरात उलटी गंगा वाहत असल्याची चर्चा आहे.

नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजय घोडमारेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

विजय घोडमारे हे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे घोडमारे तेव्हापासून नाराज होते.

2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्यता असल्यामुळे नाराज असलेल्या विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. यंदाही विद्यमान आमदार समीर मेघे यांनाच भाजप पुन्हा तिकीट देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकीटासाठी प्रयत्न केल्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. 2009 मध्ये बंग यांचा घोडमारेंनीच पराभव केला होता.                                   


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: